`राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यास हे राज्य सरकार अपयशी`

0
1098

मुंबई,दि. ३० (पीसीबी) : संपूर्ण महाराष्ट्रात गेली वर्षभर महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. गेल्या दोन महिन्यापासून तर मुंबईत याचं प्रमाण लक्षवेधी ठरत आहे. मात्र तरीही गृहखातं आणि राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यास हे राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेली आहे.

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून तर यामध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना कोविड सेंटर्समध्ये देखील महिलांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती थांबलेली नाही. अगदी महिला डॉक्टरांपासून कोरोना बाधित महिला आणि अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार सुरूच आहेत. मुंबई ,पनवेल , कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील महिलांवरील अत्याचारा संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र या गुन्ह्यांसंदर्भात राज्य सरकार कोणतीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. या प्रकरणाची गंभीर दखल गृहखाते घेत नसल्यामुळे आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आमच्या सोबत पडलेला आहे. असा एकही दिवस जात नाही. ज्या दिवशी महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर येत नाहीत. पूर्वी बलात्काराचे गुन्हे असायचे आता सामूहिक बलात्काराचे गुन्हे समोर येत आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. इतर वेळी बारीकसारीक गोष्टीत आपली प्रतिक्रिया देणाऱ्या सरकारचे प्रतिनिधी या विषयात मात्र मूग गिळून गप्प आहेत. महिलांवर होणारे अत्याचार ही राज्यात चिंता वाढवणारी गोष्ट आहे. हे प्रकार थांबवण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे.