कुरकुंभमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, आग

0
271

पुणे, दि. १ (पीसीबी) : कुरकुंभ (दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला  रात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीत आग लागल्याने मोठ्याने स्फोटाचे आवाज येत होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेचा अहवाल मागितला. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून आग आणि धुराचे लोट दिसून येत होते. कंपनी गावापासून जवळच असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी गाव सोडून पळ काढल. सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर आजूबाजूच्या कंपन्यातील कामगारांना बाहेर सोडण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीत प्रचंड प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. तो जळून खाक झाला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी वारंवार घडणाऱ्या आग व स्फोटाच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनास्थळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ, दौंड नगरपरिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुणीही अफवा पसरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन महाडिक यांनी केले.

मागील पाच महिन्यातील हि दुसरी आगीची घटना आहे. यापूर्वी बुधवार 14 ऑगस्ट 2019 अल्कली आमाईन्स तसेच शुक्रवार (दि.22) मे 2020 कुसुम डिस्टीलेशन अॅन्ड रिफायनिंग, प्रा. लि. या कंपन्यामध्ये भीषण आगीच्या घटना घडल्या होत्या.