राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार यंदाही नाहीच; नव्या सरकारमध्येच नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता

0
391

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – प्रत्येक अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येतात आणि एखाद्या हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे विरूनही जातात. आताही १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यासाठी काही नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपमधील वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून नव्या सरकारमध्येच नवे मंत्रिमंडळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर ५ डिसेंबर २०१४ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नंतर मात्र मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. याबाबत बोलताना भाजपच्या एका मंत्र्याने सांगितले, २०१७ ला मंत्रिमंडळ विस्तार करायचा होता. यादीही तयार होती आणि ती मंजुरीसाठी दिल्लीला पाठवली होती. दिल्लीहून परवानगी न मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. या वेळीही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सरकारला काहीही काम करता येणार नाही. आता जर मंत्रिमंडळ विस्तार केला तर नव्या मंत्र्यांना काही महिन्यांचाच कालावधी मिळेल.

दिल्लीच्या परवानगीनेच होऊ शकतो विस्तार

दिल्लीहून मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सांगण्यात आले तर मात्र मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असेही भाजपच्या या मंत्र्याने सांगितले. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबतही चर्चा होती. परंतु अशी कोणतीही ऑफर भाजपने दिली नसल्याचे शिवसेनेच्या वर्तुळातून सांगण्यात आले.