राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेवर दगडफेक

0
609

जोधपूर, दि. २६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी  गौरव यात्रा सुरू  केली आहे.  या दरम्यान, जोधपूरमध्ये वसुंधरा राजेंना विरोध  करून  पीपाड येथे रात्री उशीरा त्यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली, यामध्ये अनेक वाहनांचे  नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अशोक गहलोत यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.

रक्षाबंधन असल्यामुळे पुढील तीन दिवसांसाठी त्यांची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. ओसिया येथे वसुंधरा राजे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. देचू येथे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली, शेरगढमध्ये काही जणांनी त्यांचे पोस्टर फाडले. तर भोपालगड विधासभा क्षेत्रातील बावडी येथे सभेच्या आधी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसच्या एका नेत्याच्या इशाऱ्यावरुन हे सर्व करण्यात येत आहे. ज्या लोकांनी राज्यासाठी काहीही केलेले नाही, सत्तेपासून दूर असल्यामुळे ते बावचळले आहेत, म्हणून ते  एका महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही घाबरणार नाही, नारीशक्ती कोणालाही घाबरत नाही. राजस्थानसाठी माझा जीव गेला तरी मी माझं नशीब समजेल,  अशी प्रतिक्रिया वसुंधरा राजे यांनी दिली आहे.