रहाटणीत महापालिकेचा दवाखाना सुरू करावा – नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन

0
700

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २७ मधील रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर या भागात सर्वसामान्य कामगार वर्गाचे व गोरगरीब नागरिकांचे प्रमाण जास्त  आहे. मात्र, प्रभागात महापालिकेचा एकही दवाखाना नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेचा दवाखाना सुरू करावा. अशी मागणी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

त्रिभुवन यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी दवाखाना उपलब्ध करुन देण्यात येतात. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ मधील रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर या भागात सर्वसामान्य कामगार वर्गाचे व गोरगरीब  नागरिकांचे प्रमाण जास्त  आहे. या परिसरात सुमारे ५०,००० इतकी लोकसंख्या आहे. परंतु या ठिकाणी महापालिकेचा एकही दवाखाना उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी मोठी गैरसोय होते.

वाढत्या नागरिकरणामुळे या भागात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ओ.पी.डी. (बाहय रुग्ण विभाग) सुरु केल्यास येथील नागरिकांची होणारी गैरसोय दुर करणे शक्य होणार आहे. तरी दवाखान्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन घेवुन त्या ठिकाणी ओ.पी.डी. सुरु करावी.