रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापौराला गाडीला बांधून नेले फरफटत

0
1233

मॅक्सिको, दि.१२ (पीसीबी) – देशभरामध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय चर्चेत असतानाच आता थेट परदेशामधील रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्ते खराब असल्याने महापौरालाच गाडीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार दक्षिण मॅक्सिकोमधील एका गावामध्ये घडला आहे. खराब रस्त्यांची अनेकदा तक्रार करुनही त्याबद्दल कोणतीही कारवाई न केल्याबद्दल नागरिकांनी महापौर कार्यालयावर हल्लाबोल केला. संतापलेल्या नागरिकांनी महापौराला कार्यालयाबाहेर काढून त्याला गाडीला बांधून खराब रस्त्यांवरुन फरफटत नेले. अखेर पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांना सोडवले.

जॉर्ज यांच्याकडे गावकऱ्यांनी खराब रस्त्यांची अनेकदा तक्रार केली होती. मात्र महापौरांनी आश्वासन देत नागरिकांची बोळवण केली. वारंवार असेच घडल्यानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि ते महापौर कार्यालयावर धडकले. त्यांनी महापौर जॉर्ज यांना मारहाण करुन कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर दोरखंडांनी त्यांना पिकअप ट्रकला बांधले आणि रस्त्यांवरुन फरफटत नेले. या घटनेचे चित्रिकरणही अनेकांनी केले. हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेले व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये महापौर कार्यालयातून काही लोकांनी जॉर्ज यांना खेचून बाहेर काढत गाडीच्या मागच्या बाजूला बांधताना दिसतात.