१० रूपयांमध्ये जेवण, १ रूपयांमध्ये आरोग्य चाचणी; शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिध्द

0
600

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने १० रूपयांमध्ये जेवण आणि ‘वन रूपी क्लिनिक’ असे आश्वासन असणारा जाहीरनामा आज (शनिवार) प्रसिद्ध केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई उपस्थितीत होते.

तिजोरीवर किती भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातील एकही मत खोटं ठरणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

तर हा वचननामा बनवताना ५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून वचननामा बनवलेला आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  या वचननाम्यावर बारकोड आहे, जर बारकोड स्कॅन केला तर http://shivsenavachannama2019.com या वेबसाईटवर जाता येईल, असेही त्यांनी माहिती दिली.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासने –

१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचं विशेष खातं.

२. ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार.

३. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचं शिक्षण मोफत करणार.

४. राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना ‘युवा सरकार फेलो’मार्फत शिष्यवृत्ती

५. रोजगाराभिमूख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.

६. अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार.

७. तालुका स्तरावर गाव ते शाळा प्रवासासाठी विद्यार्थी एक्स्प्रेसची सुरूवात करणार.

८. प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक व शारीरिक तपासणी करणार.

९. नगरपरिषदा, नगरपालिके, महानगरपालिकेत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद.

१०. ज्या ठिकाणी बससेवा नाही त्या ठिकाणी मुंबईप्रमाणे बससेवेची सुरूवात करणार.

११. सर्व राज्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार.

१२. ‘शिव आरोग्य योजने’अंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करणार.

१३. राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापणार.

१४. सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदं भरणार.

१५. ‘मुख्यमंत्री आवास योजने’अंतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चं घर देणार.