योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं

0
269

-उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकिसाठी शरद पवार यांचा मेगा प्लॅन

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.

‘पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असं पवार यांनी सांगितलं.

‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत’, असा दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की 80 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. 20 टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.