येत्या चार दिवसांत मान्सून कोकणात धडकणार; हवामान विभागाचा अंदाज

0
604

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  येत्या तीन दिवसात कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस होईल. तर २१ तारखेपर्यंत मान्सून कोकणात येईल आणि २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभऱ पोहचेल, असा अंदाज   हवामान खात्याने  वर्तवला आहे. यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बऴीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.  

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत आहे. यामुळे  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीला  अनुकूल वातावरण तयार झाले आहे.  कर्नाटकमध्ये पोहोचलेले मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचण्यास सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे.  कोणताही मोठा अडथळा निर्माण न झाल्यास दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

यंदा मोसमी पावसासमोर विविध अडथळे निर्माण झाले आहेत. अंदमानात १८ मे रोजी दाखल झाल्यानंतर केरळमध्ये १ जूनला अपेक्षित असताना तेथे मोसमी वारे आठवडय़ाने उशिरा पोहोचले. त्यानंतर चांगली वाटचाल सुरू असताना चक्रीवादळाने त्यांची वाट रोखली. १३ ते १४ जूनला मोसमी वाऱ्यांचा प्रवेश महाराष्ट्रात होण्याचा अंदाज असताना चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने त्यांची प्रगती थांबली होती.