युवा गायिका नंदिनी गायकवाड पंडित रतिलाल भावसार पुरस्काराने सन्मानित

0
289

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : “उमेदवारीच्या काळात मिळालेला सन्मान आयुष्यभरासाठी प्रेरणा देतो!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी नादब्रह्म, देवधर सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवड येथे काढले. नादब्रह्म परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी युवा आश्वासक गायकासाठी देण्यात येणारा पंडित रतिलाल भावसार स्मृती पुरस्कार यंदा अहमदनगर येथील सारेगमप लिटिल चॅम्प गायिका नंदिनी गायकवाड या युवतीला प्रदान करताना प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत चौगुले बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नादब्रह्म संस्थेचे प्रमुख डॉ. रवींद्र घांगुर्डे, ज्येष्ठ गायिका डॉ. वंदना घांगुर्डे, कार्यवाह अरुण चितळे, नंदिनीचे गुरू पंडित अंगद गायकवाड, अंजली गायकवाड, भावसार परिवारातील पद्मा भावसार, राजू भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या संगीत मैफलीचा प्रारंभ नंदिनी गायकवाड यांनी पूर्वी रागातील “नैना भरी देखो…” या विलंबित एकतालातील बंदिशीने केला. त्याला “मोसे शाम तुम…” या त्रितालातील बंदिशीची जोड दिली. त्यानंतर मारुबिहाग रागातील “नींद न आये मोहे…” (त्रिताल), “मनमोहन बीन बजाए…” (एकताल) या बंदिशींचे सुरेल सादरीकरण केले. मैफलीच्या उत्तरार्धात नंदिनी यांनी “घेई छंद मकरंद…” , “उगवला चंद्र पुनवेचा…” ही नाट्यपदे अतिशय तन्मयतेने पेश केली. उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या मैफलीची सांगता त्यांनी पंडित रतिलाल भावसार यांच्या “दावा नयनी यशोदेचा सुकुमार…” या सुप्रसिद्ध गीताने केली. मैफलीत उपेंद्र सहस्रबुद्धे (संवादिनी), विनायक गुरव (तबला), वैदेही मतकर आणि श्रुती (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

या प्रसंगी मधू जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीला सांस्कृतिक चेहरा प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यामध्ये घांगुर्डे दांपत्याचे योगदान खूप मोठे आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत हा समृद्ध वारसा तरुण पिढीने जोपासला पाहिजे!” असे विचार मांडले.

श्रीकांत चौगुले पुढे म्हणाले की, “अभिजात संगीत हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. शेकडो वर्षांचा कलेचा वारसा गुरू परंपरेने जतन केला आहे. नादब्रह्माची उपासना करणाऱ्या, संगीत साधकांच्या वतीने होणारा सत्कार हा प्राचीन गुरू परंपरेचा आशीर्वाद आहे!”

नादब्रह्म परिवाराने संयोजनात परिश्रम घेतले. ध्वनीसंयोजन दर्शन कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन अनुश्री पानसे यांनी केले.