युती झाल्यास शिवसेनेला मावळ मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार; मुख्यमंत्र्यांची प्राधिकरणात सभा आयोजित करून भाजपचा सेनेला सूचक इशारा!

0
3143

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आता खऱ्या अर्थाने तापू लागले आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, असा संभ्रम असताना शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने शड्डू ठोकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. विशेषतः मावळ मतदारसंघात भाजपचे कमळ शंभर टक्के फुलणार असल्याची पक्षाला खात्री आहे. युती झाल्यास मावळ मतदारसंघ कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा भाजपने चंग बांधला आहे. मावळ मतदारसंघात येणाऱ्या निगडी प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन करून भाजपने शिवसेनेला सूचक इशाराच दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे युती झालीच, तर शिवसेनेला मावळ मतदारसंघावर पाणी सोडावे लागण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचा अक्षरशः पालापाचोळा झाला. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असल्यामुळे पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. मोदी लाटेच्या या धक्क्यातून विरोधी पक्ष अद्यापपर्यंत सावरलेले नाहीत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीत, हे वास्तव आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा विजय मिळूनही शिवसेनेला या दोन्ही मतदारसंघावर पकड निर्माण करता आलेली नाही. शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पक्ष कार्यकर्त्यांना मोठे करायचे नाही, अशी शपथच घेतलेली दिसते. पक्षाऐवजी त्यांचे ऐकणाऱ्यांनाच दोन्ही खासदारांनी पदाधिकारी केले आहेत. कार्यकर्त्यांची मोट न बांधल्याने शिवसेनेच्या पक्षसंघटनेत मरगळ आली आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यात विस्तवही जात नाही, हे सर्वश्रुत आहे. बारणे आणि कलाटे पक्षाच्या व्यासपीठावर क्वचितच एकत्र आल्याचे पाहायला मिळते. पक्षातच विसंवाद असताना खासदार बारणे यांनी जनतेशी संवाद साधण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. स्वपक्षातच संवाद नसणाऱ्या खासदारांना जनतेशी संवाद साधण्याचा नैतिक अधिकार उरतो का? हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना म्हटले की सबकुछ शिवाजीराव आढळराव पाटील हेच आहेत. मावळपेक्षा शिरूरमध्ये शिवसेनेची अवस्था थोडी बरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिरूर मतदारसंघात शिवसेनेची केडर बेस पक्ष म्हणून ओळख आहे. परंतु, सलग तीनवेळा निवडून आल्यामुळे खासदार आढळराव पाटील यांच्याविरोधात अॅन्टी इन्कम्बन्सी निश्चितच आहे.

अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीचे ढग जमले आहेत. शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने गेल्या साडेचार वर्षांत मैदान तयार केले आहे. आगामी निवडणुकीत युतीबाबत संभ्रम असताना भाजपने मावळ आणि शिरूरमध्ये शड्डू ठोकला आहे. आमदारकी ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवून भाजपने आपला राजकीय इरादा स्पष्ट केला आहे. विशेषतः मावळ मतदारसंघात भाजपने मोठी राजकीय ताकद निर्माण केलेली आहे. त्यामुळेच मावळ मतदारसंघात भाजपला विजयाची शंभर टक्के खात्री आहे. युती झाल्यास मावळ मतदारसंघावर दावा करून तो कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा भाजपने चंग बांधला आहे.

त्यासाठीच मावळ मतदारसंघात येणाऱ्या निगडी प्राधिकरणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबर रोजी सभा आयोजित करून भाजपने शिवसेनेला स्पष्ट संकेत दिले आहेत. मावळ मतदारसंघावर भाजपने निर्माण केलेली मजबूत पकड शिवसेनेलाही एक पाऊल मागे घेऊन जाणारी आहे. आगामी निवडणुकीत युती झाल्यास शिवसेनेला मावळ मतदारसंघावर पाणी सोडावे लागण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत. परंतु, हे सर्व युती होणार की नाही यावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेत काय बोलतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. ते युतीबाबत काय भाष्य करतात आणि नेते व कार्यकर्त्यांना काय राजकीय संकेत देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.