५०-५० फार्म्युल्यावर आम्ही ठाम; जागावाटपांवर अजित पवारांची भूमिका  

0
829

कोल्हापूर, दि.  २७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा  आघाडी करण्याचा निर्णय  घेण्यात आला  आहे . जागा वाटपाची बोलणी सुरू असून ५०-५०  फार्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) येथे सांगितले.

अजित पवार  कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येत्या २ तारखेला पुन्हा जागा वाटपासंबंधी बैठक होणार आहे. तसेच कोणत्या समविचारी पक्षांना सोबत घ्यायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. संभाव्य  उमेदवारांना तयारीसाठी किमान एक महिना मिळावा, यासाठी  जागा वाटपावर लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न  सुरू आहे, असे ते म्हणाले. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना  आघाडीत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही  पवारांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.  मोदी फकीर  असल्याने त्यांना संसारी माणसांचे दु:ख समजत नाही. त्यांनी केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसल्याचा पुनरुच्चारही  त्यांनी केला.
अरबी समुद्रात चमकोगिरी करायला गेल्यानेच एकाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जास्त होत होती. त्यामुळेच महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा  आरोप त्यांनी केला.

आगामी निवडणुकांसाठी ‘एक बूथ आणि २५  यूथ’ अशी व्यूहरचना करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तर  शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच त्यांना समजत नाही. शिवसेना बावचळून गेली आहे, अशी तोफ त्यांनी डागली.