…या कारणामुळे छगन भुजबळ यांनी केले नाही मतदान

0
560

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले तर हरियाणामध्ये ६५ टक्के मतदान झाले. काल राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. असे असतानाच अनेक सेलिब्रिटीजने घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र नाशिकमध्ये माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान न केल्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे. यासंदर्भात आता भुजबळ यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

भुजबळ हे स्वत: नाशिकमधील येवला मतदारसंघामधून निवडणुकीला उभे होते. तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवली. असे असतानाही त्यांनी स्वत: मात्र यंदा मतदान केले नाही. दर निवडणुकीला सकाळीच मतदान करुन दौऱ्यावर निघणारे भुजबळ यंदा मतदान करायला गेले नाहीत. सर्व भुजबळ कुटुंब नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान करते. सिडकोमधील ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंबीय मतदान करतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या मतदानसंघामध्ये दौऱ्यावर निघतात. मात्र या वर्षी हे चित्र दिसलं नाही त्याला एक विशेष कारण आहे.

मतदान का केलं नाही यासंदर्भात भुजबळांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. “येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक १०० किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर जाऊन-येऊन पाच तास म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक सुरु असल्याने मतदारसंघामध्ये थांबणेही महत्वाचे होते. आमचे मतदारसंघही मोठे-मोठे होते. त्यामुळे मतदानाल जाणे शक्य नव्हते,” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी नोंदवली आहे.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी भुजबळ यांनी सकाळी नाशिकमध्ये मतदान करुन मतदारसंघात दौऱ्यावर गेले होते. यंदा मात्र ते मतदानाच्या दिवशी दिवसभर आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजेच येवल्यामध्येच होते. लोकसभेला समीर भुजबळ यांचा पराभव झाल्याने छगन भुजबळांनी यंदा मतदारसंघातच राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा नाशिकमध्ये आहे. येवल्यामधून छगन भुजबळ यांच्यासमोर शिवसेनेच्या संभाजी पवार यांचे आव्हान आहे. तर नांदगावमध्ये पंकज यांच्याविरुद्ध शिवसेनेचे सुहास कांदे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत.