यात्रेसाठी गावाला गेलेल्या भोसरीतील कुटूंबाच्या घरी चोरी; ६४ हजारांचे दागिने घेऊन चोरटे पसार

0
723

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – यात्रेसाठी संपूर्ण कुटूंब घराला कुलुप लावून गावाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटामध्ये ठेवलेले सोने-चांदिचे दागिने असा एकूण ६४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवार (दि.२३) ते सोमवार (दि.२६) दरम्यान भोसरीतील लांडेवाडी टेल्को रोड येथील आंबेडकरनगरमधील घरात घडली.

याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांचे पती आणि मुलांसोबत शुक्रवारी सकाळी सोलापूर येथील त्यांचे मुळ गाव पुळुज येथे यात्रेसाठी गेल्या होत्या. सोमवार आबंडकरनगर येथे शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईक महिलेने फिर्यादी महिलेला फोनवर माहिती दिली कि, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून कडीकोयंडा तुटला आहे. यावर फिर्यादी महिला आणि तीचे कुटूंब तातडीने भोसरीला आले. त्यांनी घराची पाहणी केली असता चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून कडी कोयंडा उचकटत घरात प्रवेश केल्याचे समोर आले. तसेच कपाटातील सोने-चांदिचे दागिने असा एकूण ६४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. महिलेने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.