यंदा महाराष्ट्रात पावसाचे आगमन उशिरा !

0
707

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – केरळात तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये आज (शनिवार) मान्सूनचे आगमन झाले आहे. पण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी येण्यास १४ जून उजाडणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पाऊस विलंबानेच येणार आहे. राज्यभर पाऊस जूनअखेरीपर्यंत पोहोचणार आहे, अशी माहिती  हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिली आहे.

गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी ७ जून ते १३ जून या काळात पाऊस धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात १४ जूनच्या आसपास पाऊस आला तरी त्यापुढील आठवडय़ात त्याचा महाराष्ट्रात पुरेसा विस्तार होण्याची शक्यता नाही. नंतरच्या आठवडय़ात (२१ ते २७ जून) या कालावधीत बंगालच्या उपसागरातून येणारा पाऊस विदर्भापर्यंत पोहचेल. मात्र पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी जूनअखेरच (२८ जून ते ४ जुलै) उजाडणार आहे. समुद्रावर वाऱ्यांच्या बदलानुसार मान्सूनचे आगमन अवलंबून असते.

महाराष्ट्रात पावसाचे प्रत्यक्ष आगमन झाल्यानंतरच विस्तारित पाऊस अनुमानाच्या आधारे पेरण्या उशिरा करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी १४ जूनपर्यंत थांबावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे.  विभागीय हवामान केंद्र आणि मुंबई महापालिकेतर्फे घेतलेल्या संयुक्त कार्यशाळेत हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी विस्तारित पावसाचे अनुमान (एक्स्टेन्डेड रेन फोरकास्ट) या प्रणालीबद्दल माहिती देताना पावसाचे आगमन लांबण्याची शक्यता व्यक्त केली.