उसळत्या चेंडूंचा सामना केला तरच…

0
216

सिडनी, दि.२३ (पीसीबी) : भारतीय संघाला पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांना अजूनही पलटवार करण्याची संधी असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लीमन यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या वातावरणाशी जुळवून घेता आले नाही. एक वेळ भारताने वर्चस्व राखल्याची स्थिती होती. मात्र, फलंदाजांना आलेल्या अपयशाने त्यांना लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला, असे लीमन यांनी एका स्थानिक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी आणि एकूणच वातावरण हे वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते. भारतीय फलंदाजांची कामगिरी बघता त्यांना मालिकेत परतणे कठिण दिसते. पण, तरीही त्यांच्या फलंदाजांनी उसळणाऱ्या चेंडूंचा सामना अचूक केल्यास त्यांना आपले आव्हान राखता येऊ शकेल. कारण त्यांच्याकडे तेवढे चांगले गोलंदाज आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. उसळणाऱ्या चेंडूंवर भारतीय फलंदाज नेहमीच बिचकून खेळतात. त्यामुळे त्यांना येथे फलंदाजी करणे कठिण जाते, असे सांगून लीमन म्हणाले,’भारतीय गोलंदाजांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्यांच्या गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांवर हुकुमत राखण्याची क्षणता नक्कीच आहे. फक्त, भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासाने उसळत्या चेंडूचा सामना करायला हवा.’

पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे भारतीय फलंदाजी आणखीनच अननुभवी झाली आहे. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे वगळल्यास एकही अनुभवी फलंदाज नाही. त्यामुळे आता भारतीय फलंदाज मेलबर्नच्या खेळपट्टीवर कसे उभे राहतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल यात शंका नाही.