‘…म्हणून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझीलसोबतची तब्बल ३२ कोटी डॉलर्सची डील स्थगित’

0
341

नवी दिल्ली, दि.३० (पीसीबी) ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिन लसीचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी भारत बायोटेकसोबत करार केला होता. मात्र, ‘व्हिसलब्लोअर’नी (जागल्या… गैरव्यवहार वा प्रशासनाकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी उजेडात आणणाऱ्या व्यक्ती) शंका उपस्थित करत या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. ब्राझील सरकारने भारतीय लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकसोबतचा ३२ कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार स्थगित केला आहे. ब्राझीलने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी करार केला होता. या करारमुळे भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटलं असून, राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो वादात सापडण्याची चिन्हं आहेत.

ब्राझीलने भारत बायोटेकसोबत केलेल्या लस खरेदी करारात भ्रष्टचार झाल्याचा आरोप ‘व्हिसलब्लोअर’नी केला आहे. सरकारकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर आता हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात गेला असून, ब्राझील सरकारने या खरेदी कराराला स्थगिती दिली आहे. असं असलं तरी पुढे हा करार रद्द करण्यात आला, तर भारत बायोटेकला ३२ कोटी डॉलर्सचा फटका बसू शकतो. करोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबत कोव्हॅक्सिन खरेदीसंदर्भात एक करार केला. ब्राझील सरकार २० मिलियन डोस खरेदी करणार असून, ३२ कोटी डॉलर्सची ही डील आहे. मात्र, करोना परिस्थिती हाताळणीवरून आधीच टीकेचे धनी ठरलेले राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो या या लस खरेदी करारामुळे वादात सापडले आहेत.

ब्राझीलमधील ‘व्हिसलब्लोअर’नी या करारावरून सरकारला लक्ष्य केलं. भारत बायोटेकसोबत करण्यात आलेल्या लस खरेदी व्यवहारात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याची माहिती बोल्सोनारो यांनाही असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. व्हिसलब्लोअरकडून उचलण्यात आलेल्या मुद्द्यावरून ब्राझीलमध्ये सरकारविरोधात टीकेचा सूर उमटत आहे. सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले, मात्र व्हिसलब्लोअरचं समाधान करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यानंतर हे प्रकरण आता ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर ब्राझील सरकारने लस खरेदी कराराला स्थगिती दिली. ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली.