…..म्हणून चिंचवड पोलीस ठाण्यासमोरच तुफान हाणामारी

0
618

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – नातेवाईक मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून चिंचवड पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) सायंकाळी घडली. अजित संतोष कांबळे (वय 25), सचिन भिकाजी ताकपिरे (वय 35), सनी गणेश वाघमारे (वय 21), साहिल व्यंकटेश वर्मा (वय 19, सर्व रा. नढेनगर, काळेवाडी), शोएब इरशाद शेख (वय 19, भाटनगर, पिंपरी), संदीप रामचंद्र घोडके (वय 37), पंकज सुहास पाटील (वय 18, दोघेही रा. यशोपुरम, चिंचवड), सागर धनंजय कांबळे (वय 18, रा. आदित्य कॉलनी, काळेवाडी) आणि चार महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मुरलीधर नरवडे (वय 56) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाइक तरुणीशी बोलतो या कारणावरून दोन्ही गटातील तरुणांनी आपसांत संगनमत करून चिंचवड पोलीस ठाण्यासमोरच शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आपसांत फ्री स्टाइल हाणामारी केली. या आरोपींच्या विरोधात बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, साथीचा रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम तसेच महा कोविड 19 उपाययोजना अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.