“पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे आताच सांगता येत नाही”

0
186

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : राज्यावर पुन्हा एकदा करोनाचं संकट ओढवलं असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा संक्रमण वेग प्रचंड असल्याने अवघ्या महिनाभरातच आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं सुरू झालं आहे. राज्यात ठिकठिकाणी बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेड, औषधींचा तुटवडा जाणवत आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे. सध्याच्या परिस्थितीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थिती आणि राज्य सरकारकडून टाकल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली. मलिक म्हणाले, “पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे आताच सांगता येत नाही, पण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची व्यवस्था आयसीयू बेड यांची व्यवस्था करण्यासंदर्भातील अधिकार सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तर महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. आणखी क्षमता वाढवण्याचं काम राज्यात सुरू आहे. आज स्थितीत मुंबईत कोविड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आता दोन नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. प्रत्येक वार्डात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्येही नोडल अधिकारी असणार आहे. सध्या जे नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.