मोशी येथे सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’; पर्यटनमंत्र्यांची मंजुरी

0
1390

पिंपरी, दि.३ (पीसीबी) –  मोशी येथील आरक्षित जागी सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्यात येणार आहे. त्याला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. या पार्कसाठी सुमारे १५०० ते १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिका उभारणार आहे. तीन वर्षात सफारी पार्क साकारणार असून पिंपरी महापालिका आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येईल.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीत सफारी पार्क साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार महेश लांडगे, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राम पवार यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकरी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी पर्यटनमंत्री रावल म्हणाले, मोशीतील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सेन्टॉस्सा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा. त्यासाठी तातडीने एफडीआयच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात यावा. या पार्कसाठी पर्यटन विभाग निधीची कमतरता भासू देणार नाही.

त्यासोबतच ते म्हणाले सफारी पार्कचा  सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे हाम हाती घेण्याचे निर्देश पर्यटनमंत्री रावल यांनी संबंधित अधिका-यांना बैठकीत दिले. सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क’ साकारण्यात यावा. सफारी पार्क उत्तम प्रेक्षणीय स्थळ होईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, च-होलीचा भाग वेगाने विकसित होत आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प याठिकाणी हाती घेतले आहेत. सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग-व्यावसायाची वृद्धी होणार आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. यासह बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे.