मोदी सरकारवर टीका करत राज ठाकरेंच्या मनमोहनसिंगांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
487

मुंबई,दि.२६ (पीसीबी) – आर्थिक निरक्षरांनी अर्थव्यवस्थेला गर्तेत ढकलले असताना तमाम भारतीयांना मनमोहन सिंग यांच्या ज्ञानाची उणीव भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना सिंग यांनी ज्या पद्धतीने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले त्याचे महत्त्व आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे, असे स्पष्ट करत  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज (बुधवारी) वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशाच्या आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर नेणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. १९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग ह्यांची निर्भत्सना करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता.

मात्र, देशाची अर्थव्यवस्था आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना माझ्यासह तमाम भारतीयांना मनमोहन सिंग यांच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.राजकारणात टीका होतच असते. ती कधी काळी आम्ही पण केली. पण चांगल्या गोष्टीचे कौतुक करण्याचे औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे. इतिहास तुमच्या कार्याचे आणि योगदानाचे नक्कीच मूल्यांकन करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.