चिंचवडमध्ये पोलिसांना टीप दिल्याच्या संशयातून एकावर कोयत्याने वार

0
844

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरुन एका आरोपीने ३० वर्षीय तरुणाच्या मानेवर कोयत्याने प्राणघातक वार केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवार (दि.२५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवड वाल्हेकरवाडी येथील धर्मराज बंगल्याच्या खाली असलेल्या शेतात घडली.

प्रदिप दादासाहेब पळसकर (वय ३०, रा, सर्वे नं.८६, जगदाळे क्लासेससमोर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मानेवर वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निलेश कोळपे (रा. वाल्हेकरवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी प्रदिप हे त्यांचे मित्र  राहूल भालके यास मुलगा झाल्याने बाळासाहेब सांडसे, वाल्मीक कोळपे, मदन वाल्हेकर, निलेश शिवले, बंडू शिवले हे सर्वजण मिळून चिंचवड वाल्हेकरवाडी येथील धर्मराज बंगल्याच्या खाली असलेल्या शेतातील अंब्याच्या झाडाखाली मद्यपान करत बसले होते. यावेळी आरोपी निलेश आणि त्याचा मित्र जयवंत चिंतळकर हे दोघेही तेथे मद्यपान करण्यासाठी आले. त्यांनीही मद्यपान केले. फिर्यादी प्रदिप आणि त्यांच्या मित्रांनी मद्यपान संपवून जेवण करण्यासाठी बसले. यावर आरोपी निलेश याने प्रदिपने पोलिसांना टिप दिल्यानेच पोलिसांनी आपल्याला पकडून आपल्याकडील सोने जप्त केल्याच्या संशयातून धारदार कोयत्याने निलेशच्या मानेवर वार केला. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला. चिंचवड पोलीस ठाण्यात निलेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करत आहेत.