मोदी सरकारने ५ सेकंदात ७ शौचालये बांधलीच कशी? – राज ठाकरेंचा सवाल

0
439

इचलकरंजी, दि. १७ (पीसीबी) – विकासाचा कोणताच मुद्दा उरला नसल्याने शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाला कलंक आहेत. हुकूमशाही पद्धतीने देश चालविण्याचा त्यांचा डाव असून, लोकशाही संपविण्याची भाषा करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे,’ असे आवाहन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा फसलात, पुन्हा फसू नका, असा सल्लाही दिला. यावेळी राज ठाकरे यांनी स्वच्छ भारत मोहिमेवरूनही मोदी सरकारवर हल्ला चढवला. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये बांधली, असा दावा मोदींनी बिहारमध्ये केला होता. एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालये म्हणजे एका मिनिटात ८४ शौचालये आणि ५ सेकंदात ७ शौचालये बांधली जातील. हा विक्रमच म्हणायला हवा. इतक्या वेळात होत पण नाही, तितक्या वेळात यांनी शौचालये बांधली, असा टोला राज यांनी लगावला.

येथील जुन्या कोल्हापूर नाक्यामागे असलेल्या खासगी मैदानात झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच राज ठाकरेंची सभा होणार असल्याने सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. ठाकरे यांचे सभास्थळी रात्री आठ वाजता आगमन झाले. तत्पूर्वी मनसेच्या संदीप देशपांडे, परशुराम उपरकर, गजानन जाधव, आदींची भाषणे झाली.

पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास घाबरतात, असा आरोप करून ठाकरे म्हणाले, ‘देशाला खोटी स्वप्ने दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा खोटे बोलून जनतेसमोर मते मागत आहेत. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान झाल्यापासून एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास घाबरतात.

पंडित नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून पत्रकार परिषद घेण्याची प्रथा होती, ती मोदींनी मोडीत काढली आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणेच त्यांनी पसंद केले आहे. भारताचा प्रधानमंत्री कोण असावा हे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान ठरविणारा कोण? शत्रूराष्ट्राचा पंतप्रधान आपल्या देशात कोण निवडून यावा यावर भाष्य करतो, यामागे मोठे राजकीय कटकारस्थान शिजत आहे. त्याचाही जनतेने शोध घेणे गरजेचे आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘मोदी आणि शहा देशाचे कलंक आहेत. मोदी हिटलरच्या वाटेवर देश घेऊन जात आहेत. हिटलरनेही हीच नीती अवलंबली होती. आता पुन्हा एकदा मोदींनाही देशात हुकूमशाही राजवट आणायची आहे. गोबेल्सची नीती अवलंबली जात असून, देशात अस्थिरता निर्माण करून धर्माच्या नावावर समाजात भांडणे लावायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा हे या सरकारचे एकमेव धोरण आहे. मात्र, जनतेने बेसावध न राहता मोदी व शहा यांना राजकीय क्षितिजावरून कायमचे नष्ट करा.’

मोदी, शहांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूकीपूर्वीपासूनच राज ठाकरे यांच्या मनसेने भाजप सरकारवर कडाडून टीका सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रत्येक सभांमध्ये टीकास्त्र सोडताना भाजपचा पराभव करा, असेच धोरण त्यांनी स्वीकारले आहे. इचलकरंजीतील विराट सभेत ठाकरे या दोघांविरोधात कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दोघेही देशाचे कलंक असल्याचे सांगत त्यांनी नेहमीच्या ठाकरे शैलीत त्यांचा खरपूस समाचार घेताना अनेक उदाहरणे दिली.