मोदी लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात; संजय राऊतांचा उपरोधिक टोला   

0
1071

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची मोदी सरकारने तयारी सुरू केली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी ठरवले, तर ते भारताच्या लोकसभेसोबत रशियाची निवडणूकही घेऊ शकतात, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

वन नेशन वन इलेक्शनला आमची तयारी आहे, पण एक देश, एक कायदा करावा. काश्मिरबाबत वेगळी भूमिका का? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला. भाजप प्रसिद्धीच्या माध्यमातून लोकांची नाराजी दूर करू शकत नाही. आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसणार आहे, असेही राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुका घेण्याबाबत नेहमीच सुतोवाच केले आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने सरकार एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा  निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत देशात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य नाही. मात्र, त्यासाठी  योजनाबद्ध पद्धतीने नियोजन केल्यास अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेणे शक्य होईल. तसेच यासाठी कायद्यात दुरूस्ती करावी लागणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांनी म्हटले आहे.