मोदी मंत्रिमंडळात पुन्हा अवजड उद्योग खातेच मिळाल्याने शिवसेना नाराज?

0
406

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेची नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपात अवजड उद्योग खाते देऊन बोळवण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या वेळी शिवसेनेला महत्वाचे खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेला अवजड उद्योगासारखे खाते दिल्याने शिवसेनाही नाराज झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेत पुन्हा नाराजीनाट्य रंगणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव करत खासदार झालेले शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी शिवसेनेला लोकांशी थेट संबंध असलेलं एखादं महत्त्वाचं खातं मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र खातेवाटपादरम्यान त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आलं. या पूर्वी शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग खाते देण्यात आले होते. १८ खासदार असलेल्या शिवसेनेला केंद्रात केवळ एकच मंत्रिपद मिळालं आणि तेही अवजड उद्योग हे शिवसेनेचा अपेक्षाभंग करणारं आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली आहे.

शिवसेना जराही नाराज नाही – संजय राऊत

अवजड उद्योग खाते मिळाल्याने शिवसेना अजिबात नाराज झालेली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. ‘खातेवाटपानंतर शिवसेना नाराज असल्याच्या चर्चेला काहीएक अर्थ नाही. या चर्चा फक्त प्रसारमाध्यमे घडवून आणत आहेत. जो संदेश आम्हाला पंतप्रधानांना द्यायचा होता तो आम्ही दिलेला आहे. आम्ही किंचितही नाराज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.