मोदी दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात – प्रकाश आंबेडकर

0
425

औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी हे अतिशय स्वच्छ कारभार करत असून त्यांनी कधीही पैसे खाल्लेले नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. हे खरे आहे, मोदी दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात, असा सडकून आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) येथे केला.

औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मोदींच्या कारभारात देश बुडवण्याचे धोरण आहे. मॉब लिन्चिंगचे प्रकार देशात वाढले आहेत. ते अत्यंत चुकीचे आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. रिलायन्सची दिवाळखोरी संपवण्यासाठी पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत नेले जात आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत, तर मग पाकिस्तानमध्ये पेट्रोल ३५ रुपये लिटर आणि श्रीलंकेत पेट्रोल २८ रुपये लिटरने कसे मिळते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपने देशाचा मालक असल्यासारखे वागू नये. उद्योजकांची कर्जे तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. हे तर शेतकऱ्यांना सालगड्यासारखए वागवण्यासारखे आहे. शेतकरी तुमचा नोकर आणि तुम्ही मालक असे नाही. तुम्ही फक्त पाच वर्षांसाठी सत्तेवर आला आहात, हे लक्षात ठेवा, असेही आंबेडकर म्हणाले.