मोदी खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार – नवज्योतसिंग सिध्दू

0
438

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केवळ खोटी आश्वासन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मोदी आता खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार आहेत, अशी टीका काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांनी  मोदी यांच्यावर केली आहे.

पत्रकार परिषदेत सिध्दू बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करून  मोदी यांच्या खोट्या आश्वासनांची चिरफाड केली.

सिद्धू म्हणाले की, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणलेली नमामी गंगे योजना २०१९ पर्यंत संपेल, असे सांगितले होते. त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली. त्यापैकी केवळ ६ हजार कोटी रुपयेच खर्च केले. योजनेतील ट्रीटमेंट प्लांटचे काम १० टक्केच पूर्ण झाले  आहे.

वाराणसीत गंगा आजही सर्वाधिक प्रदूषित आहे.जालियनवाला बाग हत्याकांड ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: मोदी आहेत. पण पाच वर्षांत त्यांनी ट्रस्टची एकही बैठक घेतली नाही किंवा ट्रस्टवर एकाचीही नेमणूक केलेली नाही. ट्रस्टमार्फत कामे करण्यासाठी ४० कोटींची घोषणाही केली. पण तो निधी दिलाच नाही, असे त्यांनी सांगितले.

अडीच लाख गावांमध्ये फेब्रुवारी २०१९ पर्यंत डिजिटल इंडिया योजनेद्वारे इंटरनेट कनेक्टिविटी पोहोचवू, असा दावा मोदींनी केला होता.  पण अद्यापही  १ लाख गावांमध्ये इंटरनेट पोहचलेली नाही. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २०२० पर्यंत ४० कोटी लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार होते. पण आतापर्यंत ४१ लोकांनाच प्रशिक्षण  दिले आहे, यातून केवळ ६ लाखच  रोजगार मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले.