मोदींना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देणार- अकबरूद्दीन ओवेसी

0
557

हैदराबाद, दि. २५ (पीसीबी) – एमआएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधानांना चौकीदार शब्द एवढाच आवडत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे. त्यांना मी चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देईन,’ असा टोला अकबरूद्दीन ओवेसी यांनी हाणला आहे.

रविवारी हैदराबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अकबरूद्दीन ओवेसी यांनी ही टीका केली. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहिलेले पाहिले. त्यांनी केवळ ट्विटरवरच नव्हे तर आधार कार्ड आणि पासपोर्टवरही ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहायला हवे,’ असा टोला लगावतानाच ‘देशाला पंतप्रधानाची गरज आहे. चहावाला किंवा भजीवाल्याची गरज नाही. त्यांना चौकीदार शब्दात एवढीच रूची असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देईन,’ असा चिमटाही त्यांनी काढला.