मोदींना क्लिन चिट देऊन शरद पवारांनी दुटप्पीपणा दाखवला – प्रकाश आंबेडकर

0
569

सोलापूर, दि. २९ (पीसीबी) – राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेसने घेतलेली भूमिका योग्य आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पंतप्रधान मोदींना याप्रकरणावरून क्लिन चिट देऊन दुटप्पीपणा दाखवला आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (शनिवार) सोलापुरात केली.

वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा सोलापुरातील पार्क मैदानावर झाली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर  बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मी नाशिकमध्ये राफेल विमान कराराबाबत बोललो. त्यानंतर काँग्रेसने आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली.  मात्र, शरद पवार म्हणतात यात काहीही गडबड नाही. हे वक्तव्य करून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अपमानच केला. आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी कोण निर्लज्जपणा करणार हे दिसून येईल, असाही टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर राफेल करारावरून आरोप करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नाही, असे  म्हटले होते, असे सांगून  आमचे हात कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही, असा दावा करणाऱ्या सरकारचे तोंड राफेल विमान घोटाळ्यामुळे काळे झाले आहे, अशी  टीका त्यांनी यावेळी केली.