मेस्सी, रोनाल्डो नाही, तर लेवांडोवस्की सर्वोत्कृष्ट खेळाडू

0
445

पॅरिस दि.18 (पीसीबी) : फुटबॉल विश्वावर गारुड असणाऱ्या लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तिआनो रोनाल्डो यांना या वेळी ‘फिफा’च्या वार्षिक पुरस्कारापासून वंचित रहावे लागले आहे. व्यावसायिक लिगमधील बायर्न म्युनिकचा पोलंडचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोवस्की याची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षी युरोपमध्ये सर्वाधिक गोल करणारा आणि चॅंपियन्स लीगचा मानकरी होण्याचा मान मिळालेल्या ३२ वर्षीय लेवांडोवस्कीने पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी, रोनाल्डोला सहज मागे टाकले. महिला विभागात हा पुरस्कार इंग्लंडची बचावपटू ल्युसी ब्रॉंझ हिने मिळविला. लेवांडोवस्की आणि ब्रॉंझ प्रथमच या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

फुटबॉल विश्वात या वर्षी लेवांडोवस्कीला दुसरा बहुमान मिळाला. यापूर्वीच ‘युईएफए’ने त्याचा युरोपमधील वर्षााचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविले आहे. लेवांडोवस्की जर्मनच्या बुंडेसलिगा स्पर्धेत गेल्या पाच मोसमात चौथ्यांदा सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू ठरला आहे. या वर्षी त्याने १५ गोल केले आहेत.

दुसरा फुटबॉलपटू
‘फिफा’ पुरस्कारात खरे तर दशकभर मेस्सी आणि रोनाल्डो यांची जणू मक्तेदारीच राहिली होती. या दोघांमध्येच अनेक वर्षे हा पुरस्कार विभागला जात होता. मेस्सी आणि रोनाल्डो यांची १३ वर्षांची मक्तेदारी आता हळूहळू कमी होतीयं अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, सर्वप्रथम ल्युका माॉर्डिचने २०१८ मध्ये आणि आता लेवांडोवस्कीने या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. या दिग्गजांना पुरस्कारापासून दूर ठेवणारा हा दुसरा फुटबॉलपटू ठरला. महिला विभागात ब्रॉंझ हिने रेनार्ड आणि हार्डर या दोघींना मागे टाकून हा पुरस्कार मिळविला. दोन स्टार खेळाडूंच्या साथीत पुरस्कारासाठी मला नामांकन मिळणे हेच माझ्यासाठी आश्चर्य होते. आता पुरस्कारासाठी निवड होणे ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे, असी प्रतिक्रिया ब्रॉंझ हिने व्यक्त केली.

बायर्नसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे त्यांच्याच संघाच्या मॅन्युएल न्यूएर याची पुरुष विभागात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड झाली. महिला विभागात हा मान फ्रान्सच्या सारा बौहाडी हिला मिळाला. लिव्हरपूलचे व्यवस्थापक जुर्गन क्लॉप यांची सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या सोन हेुंग मिन याने २०१९ मध्ये प्रिमियर लीगमध्ये केलेला गोल सर्वोत्कृष्ट वैयक्तिक गोल ठरला.