मूळ ओबीसी नगरसेवकालाच महापौर करा; भाजप नगरसेवक संदिप कस्पटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
811

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी मूळ ओबीसी नगरसेवकाचीच निवड करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदिप कस्पटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक कस्पटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेचे महापौरपद हे अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. महापौरपदी संधी मिळवण्यासाठी मूळ ओबीसी समाज सरसावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करूनच या पदाची निवड केली पाहिजे. शहराच्या तीनही विधानसभा मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक ओबीसी मतदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये ओबीसी मतदारांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या महापौरपदी मूळ ओबीसी डावलणे पक्षासाठी घोडचूक ठरू शकते. गेल्यावेळी प्रमाणेच यावेळीही मूळ ओबीसींना डावलून कुणबी ओबीसींना महापौरपदी संधी दिल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मूळ ओबीसी समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जावे लागेल. या सर्व बाबीचा विचार करून महापौरपदावर मूळ ओबीसी नगरसेवकाचीच निवड करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”