मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी शिवसेनेची “मी मराठी मुसलमान’ मोहीम

0
517

मुंबई , दि. १५ (पीसीबी) – आगामी निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी  शिवसेनेचे बीडमधील कट्टर शिवसैनिक नसिब शेख यांनी “मी मराठी मुसलमान’ ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. मराठी मुस्लिमांनी शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही मोहिम सुरू केल्याचे सांगून त्यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

राज्यातील मुस्लिमबहुल भागांमध्ये नसिब शेख दौरा करणार आहेत. या दरम्यान ते शिवसेनेसाठी मुस्लिमांनी मतदान करण्यासाठी प्रचार करणार आहेत.  शिवसेनेला मुस्लिम  समाजाची मते कधीच  पडत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार- खासदार करत असतात. मात्र, आगामी काळात मुस्लिम मतदारांना  जवळ करण्यासाठी “मी मराठी मुस्लमान’ ही मोहीम शिवसेनेला उपयोगी पडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मोहिमेतून शिवसेनेची मुस्लिमाबद्दल असलेली तुष्टतेची प्रतिमा बदलणार का? असाही प्रश्न उभा राहत आहे.

दरम्यान, परळी तालुक्‍यातील शिरसाळा येथील रहिवासी असलेले शेख यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून मुस्लिमांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना कधीच देशभक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हती. मात्र, शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आणि जातीयवादी असल्याचा अप प्रचार विरोधक करत राहिले, त्याचाच फटका शिवसेनेला कायम बसला आहे. शिवसेनेची ही प्रतिमा बदलण्यासाठी राज्यभर मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.