`मुख्यमंत्री भाजपाला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात`

0
264

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : “मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात”, अशी टीका काँग्रेस प्रेदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवर केली. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवेदन देत सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. यावर बाळासाहेब थोरातांनी त्यांना उत्तर दिले.

थोरात म्हणाले, “भाजप नेते फक्त तक्रारीला राज्यपालांकडे जात आहेत. त्यांना त्याशिवाय काही जमत नाही. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात. भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता कोरोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने सर्व सांगितलं आहे. त्यामुळं सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.”

“केंद्राचं पॅकेज म्हणजे झाडं लावा आधी मग त्यांना फळं येतील आणि त्यानंतर तुम्ही भूक भागवायची”, अशी टीकाही थोरातांनी केंद्र सरकारवर केली. लॉकडाऊनचे आदेश लवकरच निघतील. काय चालू ठेवायचं काय नाही यावर चर्चा सुरु आहे. सध्यातरी आधीचे नियम लागू आहेत”, असं बाळासाहेब थोरात म्हटले.

फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून सत्ताधारी आघाडी सरकारच्या कारभारावरकाही शंका उपस्थित केली. ते म्हणाले होते, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे.बारा बलुतेदारांवरही संकट आलं आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याचं टीकास्त्र फडणवीस यांनी सोडलं.