प्लॅस्टर ऑफ पॅरीस मूर्ती बंदी एक वर्षासाठी मागे घेणार ? – पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे आशिष शेलार यांची मागणी

0
299

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे, तसे निर्देश आठवड्यापुर्वीच सर्व राज्यांना दिले आहेत. गणेशोत्सवासाठी कोट्यवधी मूर्ती अगोदरच तयार आहेत, तसेच कोरोना मुळे बहुतेक मूर्तीकार संकटात सापडले आहेत म्हणून हा आदेश एक वर्षासाठी मागे घ्यावा अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपाचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे आज पत्राद्वारे केली.

शेलार यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्रातील मूर्तीकारांची व्यथा मांडली आहे. पत्रात म्हटले आहे की, नुकतेच केंद्रीय प्रदुषण मंडळाने प्लॅस्टरच्या मूर्तीवर बंद घालत असल्याचे आदेश जारी केले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो. ग्रामिण भागात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवासाठी असंख्य मूर्तीकारांनी मुर्त्या बनवून ठेवल्या आहेत. मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात हा छोटा ग्रामोद्योग आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अशा प्रकारचे मूर्तीकारांचे ४५० कारखाने आहेत.

हमरापूर,वडखेल,दादर, बोरी अशी काही खेडी पूर्णतः या उद्योगात व्यस्त असतात. या भागात सुमारे २५ लाख गणेश मूर्ती बनविल्या जातात. त्यातील मोठ्या प्रमाणावर विदेशात निर्यात होतात.आता हा निर्णय झाल्याने हे सर्व मूर्तीकार तणावाखाली आहेत.

सद्याच्या कोरोनामुळे अगोदरच आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यासाठीच प्लॅस्टर मूर्ती बंदीचा निर्णय एक वर्षासाठी पुढे ढकलावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. या दरम्यानच्या काळात यापुढे मूर्ती बनविण्यासाठी दुसरे कोणते चांगले आणि परवडण्यासारखे मटेरियल योग्य राहील याबाबत पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा तसेच आयआयटी, केंद्रीय प्रयोगशाळा यांनी सुचना करावी, असेही शेलार यांनी त्यांच्या पत्रातून जावडेकर यांना सुचविले आहे.