मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमिवर मंगल प्रभात लोढा यांना मंत्रीपद

0
225

मुंबई, दि. ९ (पीसीबी) ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळात शिंदे गट आणि भाजपचे प्रत्येकी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथ घेत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत पक्षातील आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. सध्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून त्यापार्श्वभूमीवर भाजपने मुंबईतून आमदार मंगलप्रभात लोढा यांनी संधी मिळाली आहे.

मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. दक्षिण मुंबईत लोढा यांचे वर्चस्व आहे. याचाच फायदा भाजपला होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपद हा सुद्धा याच रणनितीचा एक भाग असल्याची चर्चा सध्या आहे.

मंगलप्रभात लोढा हे व्यवसायाने बिल्डर आहेत. देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर अशी त्यांची ओळख आहे. २०१९मधील विधानसभेची निवडणूकीत त्यांनी ७० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विजय मिळवला होता. मूळचे राजस्थानच्या जोधपूरचे असलेले लोढा १९८१ मध्ये मुंबईत आले. त्यांनी लोढा समूहाची स्थापना केली. रिअल इस्टेट क्षेत्रात या समूहाचा खूप मोठा दबदबा आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दक्षिण मुंबईत लोढा यांचे वर्चस्व आहे. दक्षिण मुंबईत त्यांचे कामही मोठे आहे. मुंबई भाजपचं अध्यक्षपद लोढा यांच्याकडे आहे. मारवाडी समाजातील भाजपचा प्रमुख चेहरा अशी लोढा यांची ओळख आहे. १९९५ पासून सलग सहावेळा लोढा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र त्यांना एकदाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. मात्र, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात लोढा यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

मंगलप्रभात लोढा हे मारवाडी समाजातील असले तरी मराठी मतदारांवरही त्यांची पकड आहे. त्यामुळं नेहमी मराठीचा मुद्दा पुढे करणाऱ्या शिवसेनेला यंदा भाजप लोढा यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असल्याचे कळते. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले लोढा हे मुंबई महापालिकेत करिश्मा करुन दाखवणार का?, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?
मला मंत्रिपदाची संधी देण्यात आली. मी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी चाललो आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी पूर्ण पाडणार आहे, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.