मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पांढरे पट्टे मारणाऱ्या चौघा कामगारांना ट्रकने चिरडले; एकाचा मृत्यू तिघे गंभीर

0
837

खोपोली, दि. ३१ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (बुधवार) सकाळी नऊच्या सुमारास पांढरे पट्टे मारणाऱ्या चौघा कामगारांना भरधाव ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले.

नरेश दादुलाल मर्सकोले (वय २७, रा. मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर सुरेश दादुलाल मर्सकोले, सुनील नंदलाल कर्वती, आणि नरेंद्र मनीष बुटाके (सर्व रा. मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई-पुणे महामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आयआरबी कंपनीचे कामगार महामार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम करत होते. यावेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला भरधाव ट्रक (क्र. एमएच/०४/ईबी/८१५३) याने खोपोली जवळील माहामार्गावर काम करत असलेल्या चौघा कामगारांना चिरडले. यामध्ये कामगार नरेश याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.