मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज दोन तासांसाठी बंद

0
543

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज (शुक्रवार) पुण्याच्या दिशेकडील मार्गिकेवर दिशादर्शक आणि माहिती कमान बसवण्यात येणार असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ या दरम्यान बंद राहणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या दिशादर्शक तसेच माहिती दर्शवणारी कमान बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अमूक एक ठिकाण किती अंतरावर आहे, पुढील ठिकाण कोणते आहे, टोलनाका तसेच फूडमॉल किती अंतरावर आहे, याची माहिती देणारी जुनी कमान खराब झाल्याने याबाबतची माहिती व्यवस्थित दिसत नाही. ही कमान पूर्ण रस्त्याला व्यापणारी असते. ती बदलण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईकडील मार्गिकेवर हे काम सुरू होते. त्यामुळे पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती. आज पुण्याकडील मार्गिकेवर गँट्री उभारण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे.