अॅड. प्रकाश आंबेडकरांना सन्मान आणि प्रतिष्ठा द्या, आम्ही बाजूला होतो – असदुद्दीन ओवेसी

0
1020

नांदेड, दि. १८ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यात जर आम्ही अडसर असू तर काँग्रेसने अॅड. प्रकाश आंबेडकरांना सन्मान द्यावा, प्रतिष्ठा द्यावी. त्यांच्या ताकदीनुसार त्यांना जागा द्याव्यात, आम्ही वेगळे होऊ. आमचा प्रचार स्वतंत्रपणे करू, असे काँग्रेसला आव्हान देत एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला. तर ओवेसींच्या या भूमिकेची तारीफ करत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे आभारही मानले. परंतु आघाडीत घेण्यात ओवेसी नाही, तर ओबीसी काँग्रेससाठी अडचण ठरत असल्याचा गौप्यस्फोट आंबेडकरांनी केला.

येथील नवा मोंढा मैदानात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन सभा झाली. निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होत असल्याने या सभेत बॅ. ओवेसी आणि अॅड. आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ओवेसी यांनी नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका करत सध्याच्या सर्वच मुद्द्यांकडे लक्ष वेधले. १० टक्के आरक्षण सवर्णांसाठी असून प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे खासदार लोकसभेत असते तर त्याला विरोध केला असता. तुम्ही आरक्षण देत नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची तोडफोड करत आहात, असे ठासून सांगितले असते. परंतु सर्व सदस्य या विधेयकावर चूप बसून राहिले, असेही त्यांनी सांगितले. संविधानावर हल्ले होताना राष्ट्रीय पार्टी व राज्यातील पार्टीचे लोक चूप बसून राहतात. या देशाला राहुल गांधी, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार हे मजबूत करू शकणार नाहीत, तर दलित, ओबीसी, आदिवासी, वंचित शोषित हेच घटक मजबूत करू शकतील, असेही ओवेसी म्हणाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आजपर्यंत फक्त छगन भुजबळ यांनाच दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले. साहेबांचे पुतणे काय धुतल्या तांदळाचे आहेत का, असा प्रश्नही ओवेसींनी केला.

अॅड. आंबेडकरांकडून संघावर जोरदार टीका

आपल्या भाषणात अॅड. आंबेडकर यांनी डोंबिवलीत सापडलेल्या शस्त्रसाठ्यापासून तर नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटापर्यंतच्या घटनांचा उल्लेख करून संघाला टीकेचे लक्ष्य केले. एक देश आणि दोन प्रशासन अशी देशाची सध्याची अवस्था आहे. एक मोदी तर दुसरे मोहन भागवत प्रशासन चालवतात. संघाच्या कार्यकर्त्याकडे शस्त्रसाठा निघत आहे. यांच्या रेशीम बागेवर धाड टाकली तर एके ४७ सुद्धा मिळेल, असे ते म्हणाले.

चव्हाणांसोबतच्या चर्चेत काहीच निष्पन्न नाही

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती व्हावी यासाठी खा. अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. काँग्रेसशी चर्चा करण्यास आमची दारे अजूनही उघडी आहेत. असे आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडी व्यापक करण्यासाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आणि इतर धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांशी आमची बोलणी चालू आहे, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी कमी करा म्हणतात काँग्रेसवाले

आपल्या भाषणात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींच्या भूमिकेची प्रशंसा केली. उत्तर प्रदेशात जेव्हा त्यांना आघाडीपासून दूर ठेवले तेव्हा काँग्रेसने आम्ही सर्वच्या सर्व ८० जागा लढू, असे जाहीर केले. परंतु आघाडीत येण्यासाठी एमआयएम हे कारण असले तरी खरे कारण ओबीसी आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ओबीसींना कमी करा. तुम्ही-आम्ही दोघेच सत्ता काबीज करू. ओबीसींना एवढे का वाढवता, असे काँग्रेसचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.