मुंबईत घडली धक्कादायक घटना: लग्नाला दिला नकार म्हणून तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं

0
244

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : मुंबईतील लोकल रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली घडली. तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने धावत्या लोकलसमोर तिला ढकलून दिलं. यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाके लागले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही धक्कादायक घटना घडली असून, हा अंगावर काटे उभा करणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केला.

समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी झालेली तरुणी आणि तिला धक्का देणारा तरुण दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. एकाच ठिकाणी ते दोघेही काम करायचे. दोघांमध्ये चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मात्र, त्यानंतर आरोपी तरुणाला दारूचं व्यसन असल्याचं तरुणीला कळालं. ही गोष्ट कळाल्यानंतर तरुणी त्यांच्यापासून अंतर ठेवून राहू लागली. मात्र, तो तरुणीला त्रास देऊ लागला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती. मात्र, तरीही त्याचं त्रास देणं सुरूच होतं. दरम्यान, सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो अक्षरशः धुडकावून लावला.

लग्नाला नकार दिल्यानंतर रंगाच्या भरात सुमेधनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली. तेव्हा रेल्व स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेनं तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि लोकलच्या दिशेनं घेऊन गेला. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्याने तरूणीला प्लॅटफॉर्म आणि धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकललं मात्र तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र या सर्व झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.