‘सोलारीस करंडक’ प्रौढांच्या पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नितीन किर्तने, अजय कामत यांना दुहेरी मुकूट

0
414

पुणे,दि.२१(पीसीबी) – सोलारीस क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘सोलारीस करंडक’ प्रौढांच्या पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या पुण्याच्या नितीन किर्तने, केतन धुमाळ, अजय कामत यांच्यासह नाशिकच्या श्रीकांत पारेख व एम. सुरेश यांनी एकेरीमध्ये आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. पुण्याच्या अजय कामत आणि नितीन किर्तने यांनी सलग दुसर्‍या वर्षी स्पर्धेत दुहेरी मुकूट पटकावला.

सोलारीस क्लब, मयुर कॉलनी आज संपलेल्या या स्पर्धेच्या ३५ वर्षावरील गटामध्ये पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश केलेल्या पुण्याच्या केतन धुमाळ याने पुण्याच्याच नीरज आनंद याचा ६-३, ६-३ असा पराभव करून स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. ४५ वर्षावरील गटामध्ये नितीन किर्तने याने मुंबईच्या नीलकंठ डाबरे याचा ६-२, ६-१ असा पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवले.

५५ वर्षावरील गटात पुण्याच्या अजय कामत याने निर्मल कुमार याचा ६-०, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवले. ६५ वर्षावरील गटात एम. सुरेश याने अब्दुल हनिफ याचा ६-४, ६-४, ७० वर्षावरील गटात श्रीकांत पारेख यांनी गंगाधरन एस. यांचा ६-२, ६-० असा पराभव केला. श्रीकांत यांनी सलग दुसर्‍या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवले. दुहेरीच्या ५५ वर्षावरील गटामध्ये अजय कामत व जयंत कढे या जोडीने मेहर प्रकाश व चेतन देसाई या जोडीचा ६-३, ६-२ असा पराभव केला. ४५ वर्षावरील गटात नितीन किर्तने व संदीप किर्तने या बंधूंच्या जोडीने मुकूंद जोशी व आर. कुलकर्णी या जोडीवर ६-०, ६-१ अशी सहज मात केली. ३५ वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या मंदार वाकणकर व अभिषेक ताम्हाणे यांनी विजय आनंद व अफरोझ खान या जोडीचा ६-३, ६-३ असा पराभव केला.

दरम्यान स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीसचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.