मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

0
286

मुंबई,दि.२४(पीसीबी) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलाकाराची तक्रार करण्याची धमकी देऊन ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हीचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आज तिची पोलिस कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला इंदूर येथून अटक केली होती. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्माच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा हीने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच तिने ही तक्रार मागे घेतली होती.तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैश्यांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसाना दिले आहे.

”पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”अशा आशयाचे मेसेज तिनं मुंडेंना पाठविला होता. याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

रेणू शर्मा ही मूळ इंदौर( मध्यप्रदेश) येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (ता.२०) इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर गुरुवारी (ता.21) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी न्यायालयाने तिला आजपर्यंत (ता.२३) पोलीस कोठडी सुनावली होती. रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.