खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी

0
189

मुंबई,दि.२४(पीसीबी) – अमरावतीच्या खासदार नवनीत राणाआणि आमदार रवी राणा यांना काल मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले. रविवार असल्याने राणा दाम्पत्याला सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी वांद्रे कोर्टात सरकारी वकील प्रदीप घरत आणि राणा दाम्पत्यांचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणां यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

वांद्रे कोर्टात सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यानंतर राणांविरोधात लावलेल्या कलमांवर राणा दाम्पत्यांचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी आक्षेप घेतला. सरकारी वकिलांनी मागणी केलेल्या राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीला अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी विरोध केला. ही अटक बेकायदेशीर आहे. दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. पोलिसांनी कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती त्यानुसार घराबाहेर पडले नाहीत. तेथे शिवसैनिक जमले त्यांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आलीये असंही अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केल्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले आणि त्यानंतर मुंबईत जोरदार राडा झाला. शनिवारी सायंकाळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर अटक करण्यात आली. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल केले.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारीच आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मुंबईत पोलीस विनंती करण्यासाठी राणा यांच्या घरी गेले. मात्र, नवनीत राणा यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पोलीस आपल्याला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आले आहे, असा दावा केला होता.

‘आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आम्हाला कोणतेही वॉरंट न दाखवता घेऊन जात आहे. जर आम्हाला अटक केली तर आम्ही जामीन घेणार नाही, असा निर्धारच राणा यांनी केला. तसंच, नवनीत राणा यांनी या व्हिडीओतून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना सुद्धा मदतीसाठी आवाहन केले.