‘मी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, मला हिंदू धर्म आवडत नाही’, असे म्हणून २३ वर्षीय तरुण बेपत्ता

0
1389

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  ‘मी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. मला हिंदू धर्म आवडत नाही’, असे फोनवर शेवटचे सांगून मुलुंडमधील एक तरुण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बेपत्ता झाला आहे.

जगदीश दलाराम परिहार(वय २३, कॉलनी परिसर, मुलुंड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश हा मंगळवार (दि.२३) पासून  बेपत्ता आहे. पाकिस्तान अथवा आखाती देशात तो पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २ दिवस हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात केली आहे. जगदीश वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात  शिकत आहे. तो एका वर्षापासून फेसबुकवर पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता.

कुटुंबाने त्याला वारंवार समज दिली होती. तरीही तो या तरुणीच्या संपर्कात होता. त्याने त्याच्या बँक खात्यातून काही रक्कम काढून घेतली आणि मंगळवारपासून तो बेपत्ता झाला आहे. त्याचे शेवटचे संपर्क ठिकाण हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असल्याचे सांगितले जात आहे. याच ठिकाणाहून त्याने त्याचा भाऊ भावेशला शेवटचा फोन केला. फोनवर त्याने मला हिंदू धर्म आवडत नसल्याने मुस्लीम धर्म स्वीकारला असल्याचे भावाला सांगितले. तसेच कोणी मला संपर्क करू नये असेही सांगितले. जगदीशने त्याच्यासोबत स्वतःची सर्व कागदपत्रे नेली आहेत. मुलुंड पोलिसांसह दहशतविरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत.