शरद पवार-राज ठाकरे यांचा एकाच विमानातून प्रवास; चर्चांना उधाण  

0
877

औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. त्याचबरोबर या दोन्ही पक्षातील राजकीय जवळीक वाढताना दिसून येत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीने  काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, आज (गुरूवार)  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विमान प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

राज ठाकरे  विदर्भ दौऱ्यावरून आज औरंगाबाद येथे दाखल झाले. दरम्यान, आज संध्याकाळी मुंबईकडे निघण्यास ते विमानाने रवाना झाले. यावेळी विमानात शरद पवारही होते. शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याने त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने तगड्या उमेदवारांची शोधाशोध  सुरु केली  आहे. ज्या मतदारसंघात २५ हजारांपेक्षा जास्त मतदान आहे. अशा ४० विधानसभेच्या जागेवर मनसे उमेदवार उभे करणार आहे, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.