मी किंगमेकर आहे, मला पदाची लालसा नाही – पंकजा मुंडे

0
976

बीड, दि. १९ (पीसीबी) – गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते. आता तुम्ही मला ज्या जागी बसवले तिथे जनतेच्या हिताचे सरकार आणणे हे माझे कर्तव्य आहे. खुर्चीवर बसणे माझे कर्तव्य नाही, मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. राजधर्म निभावणे हेच माझे काम आहे, तुमचा विकास करणे हे काम आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील संघर्षांनंतर पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे स्थलांतरीत केलेला ‘दसरा’ मेळावा गुरुवारी (दि. १८) पार पडला. या मेळाव्याला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, राजकारणासाठी, मतांसाठी चुकीची तडजोड करणार नाही. आपण स्वाभिमानी आहोत. राजधर्म निभावणे हेच माझे काम आहे. तुमचा विकास करणे हे माझे काम आहे. भविष्यात विकासच सर्व रोगाचे उच्चाटन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला. दुर्लक्षितांना मोठ्या पदांवर संधी दिली. आता त्यांच्या लेकीची सत्ता आहे म्हणून मायेने तुमच्या पदरात विकासाची ओटी भरायला आली आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना भावनिक सादही घातली.

भाजपाच्या सर्वेक्षणात प्रीतम मुंडे यांची खासदारकी धोक्यात असल्याचे म्हटल्याचे वृत्त होते. याचाही पंकजा मुंडेंनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. सर्व्हे कोणी केला. इथे जमलेली गर्दी पाहावी. सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट दिले जात नाही. तर माणसं बघून तिकीट दिले जाते. महाराष्ट्रात २०१९ मध्ये विजयी घंटा वाजणारच. राज्यात आणि देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार, असा दावा त्यांनी केला. भक्तीचा बाजार मांडणे ही संताची शिकवण नाही, असे त्यांनी नमूद केले. मी कधीही थकणार नाही, थांबणार नाही आणि कोणासमोर झुकणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.