मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
963

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी (दि. ९) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीने चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनपासून आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार, त्यांचे वडील व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे उघड्या जीपमधून या पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पार्थ पवार यांचे छोटे बंधू जय पवार हे देखील उपस्थित होते. याशिवाय शेकापचे आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते.

शिवसेनेने आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. ढोलताशांच्या गजरात काढलेल्या या पदयात्रेत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.

दरम्यान उमेदवारी अर्ज भरायला जाताना राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन करून एकमेकाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार म्हणाले, “गेले अनेक वर्ष तुमचे प्रेम आम्हाला मिळाले. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले. ही देशाची निवडणूक. देशाचा, १२५ कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवायची ही निवडणूक आहे. आपणाला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचे आहे. महाआघाडीचा जाहीरनामा सर्व घटकांचा विचार करून प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, नोटबंदी, जीएसटी याचा उल्लेख नाही. पाच वर्षापूर्वी हेच नरेंद्र मोदी विकास विकास हेच बोलायचे. आता विकासाबद्दल काहीच बोलत नाहीत. याचा विचार आपण सर्वांनी केले पाहिजे. आता ही सुरूवात आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. मतदान होईपर्यंत कोणीही गाफिल राहू नका, असे आवाहन त्यांनी केले.”