मालीश केल्याने भोसरीतील १२ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
3310

भोसरी, दि. २० (पीसीबी) – शाळेतील बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या भोसरीतील एका १२ वर्षीय मुलाला उपचारासाठी मालीश करणाऱ्या एका बाबाकडे नेल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१९) पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयातून समोर आली.

रोहित शंकर तोडासे (वय १२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मृत मुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रोहित हा महात्मा फुले शाळेत शिक्षण घेत होता. सोमवार (दि.१४) जानोवारी तो शाळेतील बाथरूममध्ये पाय घसरून पोटावर पडला. शाळेतून घरी आल्यानंतर त्याने आईला पोट दुखत असल्याचे सांगितले. रोहितचे आई-वडील त्याला घेऊन नजीकच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रोहितच्या पालकांनी त्याला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.  मात्र, त्या रुग्णालयाचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी परत रोहितला घरी आणले.

त्यानंतर रोहितला पुण्यातील कर्वेनगर येथील एका बाबाकडे नेले. तेथे त्या बाबाने रोहितची तेल लावून मालीश केली.त्यानंतर रात्री रोहितने पुन्हा पोट खूप दुखत असल्याचे आईला सांगितले. यावेळी रोहितची लघवी बंद होऊन पोट दुखू लागले होते. शुक्रवारी  त्याला पुन्हा पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार  ‘स्पायनल कॉड’ दबल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, रोहितचा मृत्यू मालीशमुळेच झाला असल्याचा दावा त्याच्या घरच्यांनी केला आहे.