माझ्या घरातील मुलांचा हट्ट पुरवू शकतो; दुसऱ्यांच्या मुलांचा हट्ट कसा पुरवणार? – शरद पवार

0
593

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – माझ्या घरातील मुलांचा हट्ट मी पुरवू शकतो. मात्र, दुसऱ्याच्या घरातील मुलांचा हट्ट मी कसा पुरवणार? आणि ते चांगलेही दिसणार नाही, असे सांगून सुजय विखे पाटील यांचा बालहट्ट मी कसा पुरवणार? सुजय विखे पाटील ही राज्यस्तरावरची मोठी फिगर  नाही. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षाची नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  

शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आघाडीच्या जवळपास  सर्व जागांचे प्रश्न निकाली निघाले आहेत. लवकरच संयुक्तरित्या जागा जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. मला अनेकांनी निवडणूक लढवण्याची विनंती माझ्या निर्णयानंतर केली आहे. मी ऐकतो आणि त्याचा आनंद घेतो. आता मला थांबले पाहिजे, कारण माझे वय आता ७९  झाले आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.

भाजप अध्यक्ष अमित शह यांनी  ४५ जागा नाही, तर ४८ जागा जिंकू असे म्हणायला पाहिजे होते, असा टोला शरद पवार यांनी पुन्हा एकदा लगावला. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत होतेच कधी? असा प्रतिसवाल शरद पवार यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.