महिला उद्योजिकेला मारहाण करणाऱ्या पुण्यातील बड्या बिल्डरांना पोलिसांचे पाठबळ; पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी ठोकला मुक्काम

0
802

पुणे, दि. १७ (पीसीबी) – महिला उद्योजिका काकोली मंडल यांना मारहाण व आर्थिक फसवणूक करणाऱ्या बड्या बिल्डरांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात संबंधित बिल्डरांवरांऐवजी काकोली मंडल यांना मारहाण झालेल्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. परंतु, बड्या बिल्डरांनीही मारहाण केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, यावर आंदोलक ठाम आहेत. पोलिस गुन्हा दाखल न करता संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकांनी केला आहे. तसेच आंदोलकांनी पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले आहे.

पुण्यातील कुमार डेव्हलपर्सच्या वतीने मांजरी खुर्द येथे कुलनेशन या नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम महिला उद्योजिका काकोली मंडल यांच्या ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्स यांना देण्यात आले होते. परंतु, केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्सच्या कामागारांना वारंवार धमकावणे, खोटे अदखलापत्र गुन्हे दाखल करणे व इतर माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे काकोली मंडल यांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, काकोली मंडल यांनी स्वतः केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी कुलनेशन गृहप्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या असता कुमार बिल्डर्सचे मालक हेमकार ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे अतुल चोरडिया, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग, व्हीटीपी ग्रुपचे संतोष जैन, साईटवरील अभियंत्यांनी त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेचे चित्रीकरण करून लोणीकंद पोलिस ठाण्यात पुन्हा १९ जुलै २०१८ रोजी तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही.

त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग तसेच गोळीबार करणारा संजूसिंग रामेश्वरसिंग व इतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात दोनवेळा तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलनाची दखल घेत ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित बिल्डरांच्यावर नव्हे, तर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. परंतु, आंदोलकांनी बिल्डरांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्या अधिकाऱ्याला सांगितले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना वेळ हवा असल्याचे सांगून नंतर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिस बड्या बिल्डरांना वाचवण्याचा आणि त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच आंदोलकांनी ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सोमवारी रात्री मुक्काम ठोकत दुसऱ्या दिवशीही म्हणजे मंगळवारी (दि. १८) आंदोलन सुरूच ठेवले आहे.