महिला अत्याचाराविरोधात समविचारी संघटना एकवटल्या; कारवाईला गती आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच धाडले पत्र

0
617

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यात लहान मुली, महिला आणि विद्यार्थी यांच्यावर वाढत चाललेल्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी तसेच बाहेरुन स्थलांतरीत आणि स्थानिक गुन्हेगारांचे रेकॉर्ड ठेवून त्यांच्यावर नियोजनात्मक कारवाई करुन येत्या दहा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चा, नँशनल ब्लॅक पँथर पार्टी पुणे, अपना वतन संघटना महाराष्ट्र, ग्राहक हक्क संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांनी पुणे जिल्ह्यातील शहरी भागात आणि ग्रामीण भागात सीसीटीव्हीची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच बाहेरुन कामासाठी आलेल्या स्थलांतरीत लोकांचे चारित्र्य तपासणी करणे आणि जे घर मालक यासाठी सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई करुन त्यांना १० हजार रुपयांचा दंड करावा असेही म्हटले आहे. तसेच येत्या दहा दिवसांत पोलिसांनी संघटनांच्या मागणी बाबत काय कारवाई केली आणि त्यांचे पुढील नियोजन कसे असेल, त्याचा लेखी अहवाल सादर करावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.